नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचे परिणाम जगभर जाणवत आहेत. खुद्द अमेरिकाही या झळांपासून सुटलेली नाही. मे २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत पेट्रोलच्या (गॅसोलीनच्या) दरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अमेरिकन ऑटोमोबाईल असोसिएशनच्या (AAA) मते, अमेरिकेत रेग्युलर गॅसोलीनची सरासरी किंमत प्रति गॅलन $४.४८ ते $४.५१ पर्यंत पोहोचली आहे. केवळ गेल्या आठवड्यात, दरात प्रति गॅलन ३१ सेंटची वाढ झाली आहे. इराणसोबत युद्ध सुरू होण्यापूर्वी, फेब्रुवारी २०२६ च्या अखेरीस, दर सुमारे $२.९६ होते, ज्यात आता ५३% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. कॅलिफोर्नियामध्ये सरासरी किंमत प्रति गॅलन $६.१७ पर्यंत पोहोचली आहे. ओक्लाहोमा, कॅन्सस आणि जॉर्जियासारख्या राज्यांमध्ये किमती तुलनेने कमी असून, त्या $3.70 ते $3.89 प्रति गॅलनच्या दरम्यान आहेत.
२८ फेब्रुवारी रोजी इराणसोबत युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक तेल बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर घातलेल्या नाकेबंदीमुळे जगातील २०% तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती $100 ते $112 प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. पेट्रोलच्या किमतीपैकी सुमारे ५१% किंमत कच्च्या तेलाच्या खर्चावर अवलंबून असल्याने, पंप स्टेशनवरील किमती वाढत आहेत.
दरम्यान, वाढत्या किमतींचा अमेरिकेतील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या बजेटवर परिणाम होत आहे. एका अहवालानुसार, अनेक कुटुंबे त्यांच्या उत्पन्नापैकी जवळपास १० टक्के इंधनावर खर्च करत आहेत. अमेरिकेत, सुमारे ४४ टक्के लोकांनी गाडी चालवणे कमी केले आहे.


