IT Sector Layoffs: अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे वेळवेगळ्या स्तरात खळबळ माजली आहे. याचा सर्वाधिक फटका भारतीय IT कर्मचाऱ्यांना बसला आहे. लाखो भारतीय IT कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली आहे. याचा थेट फटका आता भारतीय IT सेक्टरधील कर्मचाऱ्यांना बसला आहे. येत्या 2 महिन्यात 50000 IT कर्मचाऱ्यांना गुप्तपणे नोकरीवरुन काढले जाणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार 2025 च्या अखेरीस 50,000 हून अधिक लोक नोकऱ्या गमावू शकतात. अनेक कंपन्यांनी या वर्षी आधीच मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. या निर्णयामुळे तंत्रज्ञान व्यावसायिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने जुलैमध्ये घोषणा केली होती की ते मार्च 2026 पर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2 टक्के किंवा सुमारे 12,000 लोकांना कामावरून काढून टाकतील. परंतु केवळ TCSच नाही, तर अनेक टेक कंपन्या, मोठ्या आणि लहान, कर्मचाऱ्यांना शांतपणे राजीनामा देण्यास किंवा इतर नोकऱ्या शोधण्यास सांगत आहेत.
कंपन्या त्यांचे कर्मचारी कमी करण्यासाठी विविध युक्त्या वापरत आहेत. जसे की खराब कामगिरीचे कारण देऊन काढून टाकणे, पदोन्नतीत विलंब करणे किंवा स्वेच्छेने राजीनामा मागणे. दरम्यान, एक्सेंचरने जून ते ऑगस्ट दरम्यान जगभरात 11,000 कर्मचाऱ्यांना नोकऱ्या काढून टाकल्या. यूएस-आधारित एचएफएस रिसर्चचे सीईओ फिल फर्शट यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, या वर्षी अनेक मोठ्या कंपन्यांनी शांतपणे अनेक लोकांना नोकरीवरुन काढून टाकले आहे.
या संदर्भातील एका अहवालानुसार एका आयटी व्यावसायिकाने त्याचा अनुभव शेअर केला, तो म्हणाला, “एके दिवशी, एचआरने मला फोन केला आणि मला सांगितले की माझी आता गरज नाही. त्यांनी मला सांगितले की हा माझा शेवटचा दिवस आहे आणि मी लगेच निघू शकतो. त्यांनी सांगितले की हा कामगिरीशी संबंधित मुद्दा आहे आणि मला तीन महिन्यांचा पगार देऊन काढून टाकण्यात आले.” त्याचप्रमाणे, काही कंपन्या ही प्रक्रिया संथ आणि गुप्त पद्धतीने करत आहेत.
एका कर्मचाऱ्याने सांगितले की, “माझ्या व्यवस्थापकाने मला सांगितले की मी अशा लोकांच्या यादीत आहे ज्यांच्याकडे कंपनी दुसरी नोकरी शोधण्यास सांगत आहे. मला तीन महिन्यांचा वेळ देण्यात आला.”
कंपन्या एआयचा वापर वाढवत आहेत
टीसीएस आणि एक्सेंचरने एकत्रितपणे जागतिक स्तरावर २३,००० हून अधिक नोकऱ्या कमी केल्या आहेत. एक्सेंचरने 865 दशलक्ष डॉलर्सच्या खर्च कपात योजनेचा भाग म्हणून जून ते ऑगस्ट दरम्यान 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.
काही मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये दररोज सुमारे 300 कर्मचाऱ्यांचे लॅपटॉप आणि खाती बंद केली जात आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की टीसीएस आणि एक्सेंचरच्या कृतींमुळे आता इतर कंपन्यांना खर्च कमी करण्याची आणि एआय आणि डिजिटल साधनांवर अधिक अवलंबून राहण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांना थेट काढून टाकण्याऐवजी, कंपन्या त्यांना राजीनामा देण्यास सांगत आहेत आणि त्या बदल्यात एका सूत्रानुसार भरपाई देत आहेत.


