मुंबई : नवीन कामगार कायद्याच्या अधिसूचनेमुळे पगार आणि टेक-होम पगाराबाबत अनेक प्रश्न आणि गोंधळ निर्माण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, आता कामगार मंत्रालयाने या प्रकरणाचे स्पष्टीकरण दिले आहे. बुधवारी, मंत्रालयाने सांगितले की, ज्या कर्मचाऱ्यांचे पीएफ कपात १५००० च्या वेतन मर्यादेवर आधारित आहे त्यांच्या टेक-होम पगारात कोणतीही कपात होणार नाही.
नवीन कामगार कायद्यांनुसार, जर तुमची पीएफ कपात १५००० च्या वेतन मर्यादेवर आधारित असेल, तर तुमचा टेक-होम पगार कमी केला जाणार नाही. पीएफ कपात या आधारावर असेल. तुमचा टेक-होम पगार फक्त तेव्हाच प्रभावित होईल जेव्हा तुमची पीएफ कपात वेतन मर्यादेवर आधारित नसेल. जर तुमचा मूळ पगार १५००० रुपयांपेक्षा कमी असेल आणि नवीन कामगार कायद्यांनुसार तुमचा सुधारित पगार वाढतो आणि पीएफ कपात वेतन मर्यादेवर आधारित असेल, तर १५००० रुपयांपर्यंतच्या मूळ पगारावर अनिवार्य पीएफ कपात केली जाईल, त्यापेक्षा जास्त कपात पर्यायी असेल.
नवीन कामगार कायदे लागू झाल्यानंतरही तुमचा टेक होम पगार कमी केला जाणार नाही. असे जरी असले तरी अनेक कंपन्या वेतन मर्यादेऐवजी त्यांच्या संपूर्ण मूळ पगारावर (वास्तविक पगारावर) पीएफ कापतात. अशा परिस्थितीत, पीएफ योगदान तुमच्या कंपनीच्या धोरणावर अवलंबून असेल आणि तुमच्या टेक होम पगारवर परिणाम होईल.


