नवी दिल्ली : भारतात अनेक परदेशी कंपन्या गुंतवणूक करताना दिसत आहे. त्यात गुगल भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या गुंतवणुकींपैकी एकाचा प्लॅन करत आहे. कंपनी आंध्र प्रदेश राज्यात १० अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करत आहे, जी भारतीय चलनात ८८७०५ कोटी रुपयांइतकी आहे. ही रक्कम भारतात गुगलचे एआय डेटा सेंटर बांधण्यासाठी वापरली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
अल्फाबेट इंक.ची उपकंपनी गुगल भारतात १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. या गुंतवणुकीमुळे १ गिगावॅट डेटा सेंटर बांधण्यासाठी निधी मिळेल. राज्य आणि टेक जायंट यांच्यातील करार मंगळवारी अंतिम होईल. गुगल या गुंतवणुकीचा वापर १ गिगावॅट डेटा सेंटर कॅम्पस बांधण्यासाठी करणार आहे. हे एआय डेटा सेंटर कॅम्पस विशाखापट्टणममध्ये बांधले जाणार आहे. हे डेटा कॅम्पस एआय इन्फ्रास्ट्रक्चर, मोठ्या प्रमाणात ऊर्जा स्रोत आणि अपेक्षित फायबर ऑप्टिक नेटवर्कला जोडेल.
एआय डेटा सेंटर कॅम्पस ही मूलतः हजारो सुपरकॉम्प्युटर आणि सर्व्हर असलेली उच्च-पॉवरची बिल्डिंग आहे. या सेंटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) मॉडेल्स प्रशिक्षित, ऑपरेट केले जातात. ओपनएआयचे चॅटजीपीटी आणि गुगलचे जेमिनी देखील अशा डेटा सेंटरमध्ये काम करतात.


