मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. मुंबई येथे राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तीन दिवसांपूर्वी त्यांनी 95वा वाढदिवस साजरा केला होता. कर्वे यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
1979 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेली चिमणराव गुंड्याभाऊ ही मालिका विशेष गाजली होती. या मालिकेतील गुंड्याभाऊची त्यांची भूमिका अजरामर ठरली. याच मालिकेने त्यांना ओळख मिळवून दिली होती. तसेच बन्या बापू या चित्रपटामधली त्यांची बापूची भूमिका देखील विशेष गाजली. राज्य सरकाराच्या पुरस्कारनेही त्यांना सन्मानीत करण्यात आले होते.
अभियंता ते अभिनेता प्रवास
कर्वे हे पेशाने इंजिनिअर होते. परंतु, अभिनयात रस असल्यामुळे त्यांनी अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते. बाळ कर्वे यांचे खरे नाव ‘बाळकृष्ण’ होते. मात्र सर्वजण त्यांना बाळ या नावानेच बोलत होते. याच नावाने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.
बाळ कर्वे यांची अभिनय कारकीर्द
बाळ कर्वे यांनी आजवर अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची उंच माझा झोका, प्रपंच, महाश्वेता, राधा ही बावरी, वहिनीसाहेब या मालिकांमधील भूमिका विशेष गाजली. याबरोबरच बन्याबापू (1978), लपंडाव ( 1993), गोडी गुलाबी ( 1991 ), चातक चांदणी ( 1992 ) हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. अजब न्याय वर्तुळाचा, आई रिटायर होते, कुसुम मनोहर लेले, मनोमनी, रथचक्र, लोभ नसावा ही विनंती, सूर्याची पिल्ले, शांतता कोर्ट चालू आहे या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका पार होती.


