महाराष्ट्र जागरण डेस्क: चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने बॉलिवूडच्या सद्यःस्थितीबद्दल निराशा व्यक्त केली आहे. तसेच चांगल्या कलाकृर्तीच्या निर्मितीसाठी तो मुंबई सोडून दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे जाण्याचा विचार करतोय, असा खुलासा त्याने केला. अनुरागने हिंदी चित्रपटसृष्टीतील नफ्याची मानसिकता, रीमेक बनवणे आणि स्टार मेकिंग संस्कृतीवर टीका केली आहे.
यामुळे सर्जनशीलता कमी होते आणि कलाकृतींमध्ये नावीन्य नसते, असं मत अनुरागने मांडले. अनुराग कश्यप म्हणाला, आता बाहेर जाऊन प्रयोग करणे माझ्यासाठी अवघड आहे, कारण त्यासाठी खूप पैसा लागतो. निर्माते नफा आणि मार्जिनचा विचार करतात. चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याआधी, तो कसा विकायचा हे ठरते. त्यामुळे चित्रपट निर्मितीचा आनंद राहात नाही. म्हणून मला पुढच्या वर्षी मुंबईबाहेर जायचे आहे.
मी दक्षिणेत जाणार आहे. मला जिथे काम करावे वाटेल, तिकडे मी जाईन, नाहीतर मी म्हातारा होऊन मरेन. मी या इंडस्ट्रीमुळे खूप निराश झालो आहे आणि वैतागलो आहे. ‘मंजुम्मेल बॉईज’ सारखे चित्रपट मल्याळम इंडस्ट्रीत बनतात, ते बॉलिवूडमध्ये कधीच बनणार नाही. पण जर एखाद्याने प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला, तर कदाचित तशा चित्रपटांची निर्मिती होईल. आधीच जे हिट झालंय, त्याचेच रिमेक बनवायचे अशी मानसिकता आहे. ते काहीही नवीन करण्याचा प्रयत्न करणार नाहीत, असे अनुराग म्हणाला. अनुराग कश्यपने टॅलेंट एजन्सींवरही टीका केली. तसेच एका अभिनेत्याने, ज्याला मी मित्र मानत होतो, तो आता मला टाळतो, कारण त्याला एका विशिष्ट पद्धतीने पुढे जायचे आहे. अशा गोष्टी इथेच घडतात, मल्याळम इंडस्ट्रीत असे घडत नाही, असे अनुरागने नमूद केले.


