आरोग्य चांगलं राहावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यानुसार, प्रयत्न केले जातात. त्यात हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी थोडी काळजी घ्यावी. वाढत्या ताणतणावामुळे आणि अनहेल्दी खाण्याच्या सवयींमुळे आणि जास्त वेळ बसून राहण्याची सवय यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका झपाट्याने वाढत आहे. पण, तुम्ही तुमच्या आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देऊन या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकता.
दररोज काही पदार्थ खाल्ल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित होण्यास, जळजळ कमी होण्यास आणि हृदयाचे योग्य कार्य करण्यास मदत होते. साल्मनसारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा-३ फॅट्स भरपूर असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. ते चांगल्या आणि वाईट कोलेस्टेरॉलमधील संतुलन राखण्यास मदत करतात. साल्मनमधील EPA आणि DHA सारखे ओमेगा-३ फॅटी अॅसिड ट्रायग्लिसराइड्स कमी करतात, हृदय गती स्थिर करतात आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यात सुधारणा करतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
अॅव्होकॅडोमध्ये फायबर, पोटॅशियम, फोलेट आणि व्हिटॅमिन-ई असते. हे सर्व पोषक घटक हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. तसेच दररोज अक्रोड खाणे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये वनस्पती-आधारित ओमेगा-३ (एएलए), निरोगी चरबी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे लोक त्यांच्या आहारात अक्रोडचे प्रमाण जास्त ठेवतात, त्यांच्यामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी चांगली असते आणि रक्तवाहिन्यांचे कार्य चांगले होते.
हिरव्या पालेभाज्या हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या
पालक, मेथी आणि मोहरीसारख्या हिरव्या पालेभाज्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात, जे शरीरात नायट्रिक ऑक्साईड तयार करून रक्तवाहिन्या आराम देतात आणि सामान्य रक्तदाब राखण्यास मदत करतात.


