नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हरियाणा विधानसभा निवडणुकांतील मतचोरी आणि मतदार यादीतील बनावट नोंदींचा मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधी यांनी दावा केला की, हरियाणात सुमारे २५ लाख बनावट मतदार आहेत, म्हणजेच राज्यातील प्रत्येक आठ मतदारांपैकी एक मतदार खोटा आहे.
राहुल गांधी यांनी सांगितले की काँग्रेसकडे “एच फायली (H-Files)” नावाची कागदपत्रे आहेत, ज्यात हरियाणातील मतचोरीबाबत ठोस पुरावे आहेत. ही फक्त एखाद्या मतदारसंघाची बाब नाही, तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर घडलेला मोठा गैरप्रकार आहे, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी म्हणाले, हरियाणातील एक्झिट पोल्स स्पष्टपणे काँग्रेसच्या विजयाकडे इशारा करत होते. मात्र निकाल पूर्णतः वेगळा लागला. इतिहासात पहिल्यांदाच पोस्टल मतं आणि प्रत्यक्ष मतांमध्ये इतका मोठा फरक दिसून आला. त्यांनी दावा केला की मतमोजणी आणि मतदार यादीत अनियमितता स्पष्ट दिसत असून, या सर्वाची सखोल तपासणी आवश्यक आहे.
ब्राझिलियन मॉडेलचा फोटो २२ वेळा वापरला
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत एक फोटो दाखवत धक्कादायक खुलासा केला. ही एक ब्राझिलियन मॉडेल आहे, पण तिचा फोटो हरियाणातील मतदार याद्यांमध्ये २२ वेळा वापरला गेला. तिच्या नावाने सीमा, स्वीटी, सरस्वती अशी वेगवेगळी नावे दाखवली गेली. हा एक फसवणुकीचा नमुना आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, अशा प्रकारचे २.५ दशलक्ष म्हणजेच २५ लाख खोटे रेकॉर्ड्स राज्यभर पसरलेले आहेत.
एका महिलेने २२३ वेळा मतदान केलं
राहुल गांधींनी आणखी एक उदाहरण देत सांगितले की, एका मतदाराने दोन मतदान केंद्रांवर २२३ वेळा मतदान केलं आहे. ती व्यक्ती हवे तितक्या वेळा मतदान करू शकते, आणि निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की आयोगाने अद्याप या घटनांची चौकशी का केली नाही.
सरकार चोरीद्वारे सत्तेत आलं – राहुल गांधी
दरम्यान, राहुल गांधी म्हणाले, भारताच्या लोकांना मी सांगू इच्छितो की सध्याचं सरकार कायदेशीररित्या सत्तेत नाही. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचे सरकार लोकशाही पद्धतीने नव्हे, तर चोरीद्वारे सत्तेत आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही फक्त हरियाणाची बाब नाही, तर देशभरातील लोकशाही संस्थांवर परिणाम करणारी गंभीर बाब आहे.


