Google Gemini Trend Risk: गुगल जेमिनीवरील Banana AI Saree Trend इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असतानाच एका महिलेनं आपला धक्कादायक अनुभव उघड केला आहे. तिच्या या अनुभवाने सोशल मीडियावर नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. महिलेनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करताना सांगितलं की तिनं साडीतील स्वतःचा फोटो जेमिनीवर अपलोड केला होता. मात्र AI कडून मिळालेल्या एडिटेड फोटोत असा तपशील समोर आला की पाहून ती थक्क झाली.
फोटोमध्ये तिच्या हातावर एक तीळ दिसत होता, जो मूळ फोटोत पूर्ण बाह्यांच्या कपड्यांमुळे दिसू शकत नव्हता. यामुळे महिला संभ्रमात पडली. तिनं प्रतिक्रिया देताना सांगितलं की, ‘AI ला माझ्या हातावर तीळ आहे हे कसं कळलं? हे खूप विचित्र आणि भीतीदायक आहे. हे कसं घडलं याची मला अजूनही कल्पना नाही.’ तिनं लोकांना सोशल मीडियावर किंवा AI साधनांवर फोटो अपलोड करताना सतर्क राहण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, या व्हिडीओला 70 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्सनीही स्वतःचे असेच अनुभव शेअर केले. काहींचं म्हणणं आहे की, AI हे त्यांच्या जुन्या अपलोड केलेल्या फोटोंमधून माहिती एकत्रित करून नवीन प्रतिमा तयार करतं. एका युजरनं लिहिलं, ‘माझ्या टॅटूज मूळ फोटोमध्ये झाकलेले होते, तरीही AI ने ते दाखवले.’ तज्ज्ञांच्या मते, ही घटना डिजिटल फूटप्रिंट संकल्पना अधोरेखित करते. म्हणजेच इंटरनेटवर आपण शेअर केलेली प्रत्येक गोष्ट AI च्या डेटाबेसमध्ये साठवली जाऊ शकते.
View this post on Instagram
नॅनो बनाना म्हणजे काय?
‘नॅनो बनाना’ हे गुगल जेमिनीमधील एक AI टूल असून, सुरुवातीला ते 3D मॉडेल्स तयार करण्यासाठी ओळखलं जात होतं. पण सध्या ते साडी ट्रेंडसारख्या क्रिएटिव्ह एडिटिंगसाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं जात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झालं आहे की AI वापरताना युजर्सनी प्रायव्हसी आणि सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.


