Sarang Sathaye Marriage: अभिनेता सारंग साठे अखेर विवाहबंधनात अडकला आहे. त्याने आपल्या गर्लफ्रेंड पॉलासोबत 28 सप्टेंबर रोजी परदेशात लग्नगाठ बांधली. या खास क्षणाला दोन्ही कुटुंबातील जवळचे नातेवाईक आणि निवडक मित्रमंडळी साक्षीदार होते. सारंगने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांना ही आनंदवार्ता दिली.
‘हो, आम्ही लग्न केले! आमच्यासाठी लग्न हे कधीच प्राधान्याचं नव्हतं, पण मागील वर्षातील कठीण प्रसंगांनी आम्हाला जाणवलं की प्रेम आणि नातं टिकवण्यासाठी एक कागदही महत्त्वाचा ठरतो. प्रेम हे नेहमीच द्वेषावर विजय मिळवतं, असे कॅप्शन देत त्याने मनातील भावना व्यक्त केल्या. लग्नसोहळ्यात गाणी, आठवणींचा आनंद, वचनांची देवाणघेवाण अशा साध्या पण भावपूर्ण वातावरणात दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली. आम्ही फक्त जोडीदार नाही तर बेस्ट फ्रेंड राहण्याचा प्रयत्न करू, असे म्हणत सारंगने आपल्या नात्याचे बंध अधिक घट्ट केले.
View this post on Instagram
लग्नाआधी सारंग आणि पॉलाने एकत्र काढलेले काही फोटो शेअर केले होते. मात्र ते खरंच लग्न करणार की नवा प्रोजेक्ट जाहीर करणार, यावरून चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला होता. मात्र, आता त्यांनी दिलेल्या या आनंदच्या बातमीनंतर चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.


