Asia Cup 2025 Trophy: आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला, पण विजेतेपद जिंकूनही भारतीय संघाला ट्रॉफी व पदके मिळाली नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यास सहमती दर्शवली, पण त्यांनी एक महत्त्वाची अट ठेवली आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, नक्वी यांनी सांगितले की, ट्रॉफी आणि पदके केवळ औपचारिक समारंभ आयोजित करून खेळाडूंना वैयक्तिकरित्या सोपवल्यास परत केली जातील. भारत-पाकिस्तानमधील राजकीय संबंध पाहता, अशी शक्यता खूपच कमी आहे. अंतिम सामन्यानंतर नक्वी ट्रॉफी व पदके घेऊन स्टेडियम सोडले होते.
बीसीसीआयचे सचिव देबजीत सैकिया यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत सांगितले की, आम्ही ट्रॉफी स्वीकारण्याचा निर्णय एसीसी अध्यक्षांकडून घेतला नाही, पण याचा अर्थ असा नाही की ट्रॉफी त्यांच्याकडे राहावी. हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असून आम्ही आयसीसीमध्ये याचा निषेध नोंदवणार आहोत.
दरम्यान, आज दुपारी 4 वाजता आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) ही बैठक होणार आहे, जिथे ट्रॉफीभोवतीचा वाद चर्चेचा विषय राहील. 24 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक सभेत बीसीसीआय आपला निषेध नोंदवेल असे अपेक्षित आहे. सध्या आशिया कप ट्रॉफी नक्वी ज्या हॉटेलमध्ये आहेत त्या ठिकाणीच ठेवली आहे. नंतर दुबईच्या स्पोर्ट्स सिटीमधील एसीसी कार्यालयातून ती भारतात परत आणली जाणार आहे.


