Pune Crime News: पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. सोमवारी (२७ ऑक्टोबर) पुणे रेल्वे स्थानकावर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत चेन्नई एक्सप्रेसमधून उतरल्यानंतर एका संशयिताला अटक केली. झुबेर हंगरगेकर असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर कट्टरतावादाच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा गंभीर आरोप आहे. एटीएसने त्याच्यावर कडक बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
एटीएस अधिकाऱ्यांनी झुबेरच्या निवासस्थानी झडती घेतली असता, कट्टरतावादी साहित्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही अटक २०२३ मधील कथित आयसिस दहशतवादी निधी व शस्त्र पुरवठा प्रकरणात एक महत्त्वाची प्रगती मानली जात आहे.
हेही वाचा – निलेश घायवळ टोळीतील सदस्याला भिगवणमधून अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
यापूर्वी ९ ऑक्टोबर रोजी एटीएसने पुण्यातील विविध भागांमध्ये १९ संशयितांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. या कारवाईत इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, आर्थिक नोंदी, कोडेड संदेश आणि संभाव्य सहकाऱ्यांची माहिती हाती लागली होती. त्या पुराव्यांच्या आधारेच झुबेरची भूमिका स्पष्ट झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही संपूर्ण कारवाई २०२३ मध्ये कोथरूड येथे दुचाकी चोरीच्या प्रकरणातून सुरू झाली होती. या तपासादरम्यान दोन संशयितांच्या डिजिटल पुराव्यातून आयसिसशी कथित संबंध असल्याचे उघड झाले. त्यानंतर हे प्रकरण एटीएसकडे आणि नंतर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडे सोपवण्यात आले.


