Hamza Burhan Death: हमजा बुरहान याच्या मृत्यूमुळे जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी जाळ्याला मोठा धक्का बसला आहे. बंदी घातलेल्या Al-Badr या संघटनेचा प्रमुख कमांडर असलेला अर्जमंद गुलजार उर्फ ‘बुरहान हमजा’ याचा पाकिस्तान-अधिकृत काश्मीर (PoK) मध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. पुलवामा हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप असलेला हा दहशतवादी दीर्घकाळ भारतविरोधी कारवायांमध्ये सक्रिय होता.
पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन उभारले होते दहशतवादी जाळे
अर्जमंद गुलजार हा मूळचा जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा भागातील रहिवासी होता. सुमारे सात वर्षांपूर्वी तो वैध प्रवास कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानात गेला होता, जिथे त्याने Al-Badr या संघटनेत प्रवेश केला. त्यानंतर तो या संघटनेचा ‘ऑपरेशनल कमांडर’ बनला आणि पाकिस्तानमधूनच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचे नियंत्रण करत होता. दहशतवादी भरती, आर्थिक रसद आणि शस्त्रास्त्र पुरवठा यामध्ये त्याची प्रमुख भूमिका असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्याला अनेक वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड यादीत ठेवले होते. २०२२ मध्ये गृह मंत्रालयाने त्याला अधिकृतपणे दहशतवादी घोषित केले होते. पुलवामा आणि दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवणे, तरुणांची भरती करणे आणि दहशतवादी नेटवर्क मजबूत करणे यामध्ये त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे आरोप आहेत.
पुलवामा ते शोपियांपर्यंत सक्रिय नेटवर्क
पुलवामा परिसर हा काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांचा संवेदनशील भाग मानला जातो. येथेच पूर्वी बुरहान वानीसारखे दहशतवादी उदयास आले होते. अर्जमंद गुलजारचे नेटवर्कही याच पद्धतीने कार्यरत असल्याचे मानले जाते, जिथे सोशल मीडिया आणि स्थानिक संपर्कांचा वापर करून तरुणांचे ‘रॅडिकलायझेशन’ केले जात होते.
सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, त्याचे जाळे पुलवामा, शोपिया आणि अवंतीपोरा परिसरात सक्रिय होते. पाकिस्तानातून निर्देश देत स्थानिक ओव्हरग्राउंड वर्कर्सच्या माध्यमातून शस्त्रे, निधी आणि हल्ल्यांचे नियोजन केले जात असल्याचा आरोप त्याच्यावर होता. स्फोटक साठा, ग्रेनेड हल्ले आणि भरती मोहिमा यांसारख्या अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचे नाव जोडले गेले होते.


