Parbhani News : परभणी जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकरी आणि वाहनधारकांचे हाल होत आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर “नो स्टॉक”चे फलक लागले असून ज्या ठिकाणी डिझेल उपलब्ध आहे, तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. अशातच काही पेट्रोल पंप चालकांकडून शेतकऱ्यांना “सातबारा दाखवा आणि मगच डिझेल घ्या” अशी अट घालण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शेतीची कामे सुरू असताना डिझेलअभावी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक शेतकरी सकाळपासून कॅन आणि ट्रॅक्टर घेऊन रांगेत उभे राहत आहेत. मात्र काही पंपांवर सातबारा उतारा दाखवल्याशिवाय डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्येही इंधनासाठी झुंबड
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात भराडी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलसाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुचाकी, चारचाकी वाहनांसह ट्रॅक्टर चालकांनीही इंधनासाठी मोठी गर्दी केली होती.
इंधन टंचाईच्या भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर साठा करण्याचा प्रयत्न करत असल्याने अनेक पंपांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा फटका शेती कामांनाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाशिममध्ये मध्यरात्रीपर्यंत रांगा
वाशिम जिल्ह्यातही डिझेलच्या तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अकोला नाका परिसरातील छाबडा पेट्रोल पंपावर डिझेलचा टँकर पोहोचताच मोठी गर्दी झाली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे डिझेल वितरणाला उशीर झाल्याने अनेक वाहनधारक आणि शेतकऱ्यांना मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पंपावर थांबावे लागले.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे संतापले
दरम्यान, शेतकऱ्यांकडून सातबारा मागितल्याच्या प्रकारावर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“परभणीत पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांकडून सातबारा मागत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. डिझेल आणि पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. कुठल्याही पेट्रोल पंप चालकाने मनमानी निर्णय घेतला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.


