Ashok Kharat Case: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने आता राज्याच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. ‘बात निकली है तो दूर तलक जाएगी’ या उक्तीप्रमाणे, या भोंदूगिरीच्या जाळ्यात आता केवळ सामान्य नागरिकच नाही, तर बडे राजकारणी, जिल्हाधिकारी (Collector) आणि पोलीस महानिरीक्षक (IG) अडकल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उद्या या संदर्भात मोठा ‘गौप्यस्फोट’ करणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर ‘अघोरी’ प्रकार?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांकडून सातत्याने एक गंभीर आरोप केला जात आहे, तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर करण्यात आलेली ‘काळी जादू’. या अघोरी कृत्यामागे नेमका कोणाचा हात आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार घडला, याचा छडा आता दमानिया लावणार आहेत. उद्या, बुधवारी १५ एप्रिल रोजी होणाऱ्या पत्रकार परिषदेत या प्रकरणातील गूढ उकलण्याची शक्यता आहे.
१८२५ कॉल्सचे रहस्य काय?
तपासादरम्यान अशोक खरातच्या फोनचे रेकॉर्ड्स तपासले असता, तब्बल १८२५ नंबरवरून त्याला संपर्क करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामध्ये तहसीलदार, पोलीस निरीक्षकांपासून ते थेट जिल्हाधिकारी आणि आयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. खरातने स्वतःच्या फायद्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला आणि बदल्यात राजकारण्यांना ‘अध्यात्मिक’ फायद्याचे आमिष दाखवल्याचा दावा करण्यात येत आहे.
बड्यांची नावे होणार जाहीर
अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले आहे की, खरातला फोन करणाऱ्यांची यादी त्यांच्याकडे तयार आहे. “राजकारण्यांची नावे ऐकून संपूर्ण राज्याला धक्का बसेल,” असा दावा त्यांनी केला आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी एका भोंदूच्या दरबारात का हजेरी लावत होते? आणि सत्तेत बसलेल्या नेत्यांना या भोंदूची गरज का भासली? या प्रश्नांच्या उत्तरांकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. भोंदू अशोक खरातने केवळ फसवणूकच केली नाही, तर राजकारणी आणि अधिकाऱ्यांची एक ‘साखळी’ तयार केली होती. उद्याच्या पत्रकार परिषदेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


