Akola District Collector Taken Bribe News : अकोला जिल्ह्यात लाचखोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाणी सुरू ठेवण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
माहितीनुसार, जिल्ह्यातील गौण खनिजांच्या सुमारे ७० खाणी सुरू ठेवण्यासाठी गायकवाड यांनी प्रत्येक खाणमालकाकडून १५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी खाणमालकांनी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून पुराव्यासाठी ऑडिओ क्लिप्सही सादर केल्या आहेत.
तक्रार दाखल झाल्यानंतर तब्बल ९ दिवसांनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 308(2), 351(1) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम 7 नुसार कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रमोद गायकवाड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


