Katraj-Kondhwa Road: गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरलेल्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने भूसंपादनाच्या अंतिम निवाडा प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला असून, यामुळे आता प्रत्यक्ष कामाला वेग येणार आहे. मंत्रालयात अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रखडलेला भूसंपादनाचा तिढा आता सुटला आहे.
पहिल्या टप्प्यातील नियोजित विकासकामे
विकास आराखड्यात (DP) हा रस्ता 84 मीटर रुंदीचा असला, तरी सध्या भूसंपादनातील अडचणींमुळे पहिल्या टप्प्यात 50 मीटर रुंदीचा रस्ता विकसित केला जाणार आहे. 3.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 129 मिळकतींमधील सुमारे 52,630 चौरस मीटर क्षेत्र ताब्यात घेतले जाणार आहे. या विकासकामांत मुख्य रस्त्यासह दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड, पावसाळी गटारे आणि माऊलीनगर येथे ग्रेड सेपरेटर बांधला जाईल. प्रशासनाने जून 2026 पर्यंत हा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
वाहतूक कोंडी आणि अपघातांपासून मिळणार मुक्ती
दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा रस्ता जड वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सध्या या मार्गावरून तासाला 15,000 हून अधिक वाहने धावतात, ज्यामध्ये अवजड वाहनांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे येथे कायम वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण जास्त असते. हा रस्ता रुंद झाल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून सुरक्षित प्रवास शक्य होणार आहे.
राजस चौक उड्डाणपूल आणि भविष्यातील फायदे
या प्रस्तावाच्या मंजुरीमुळे राजस चौक येथे ‘NHAI’ द्वारे उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामालाही मोठी गती मिळणार आहे. पुलाच्या उतारासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हिस रोडचे काम आता युद्धपातळीवर पूर्ण करता येईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोपदेव घाट आणि दिवे घाटातून येणाऱ्या वाहनांना सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध होईल, ज्यामुळे दक्षिण पुण्यातील संपूर्ण वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल पाहायला मिळेल.


