Pune Accident: शासकीय कर्तव्याचे पालन करत असताना एका तरुण प्राध्यापकावर काळाने झडप घातल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. निवडणूक विभागाच्या बीएलओ (BLO) पदाची जबाबदारी सांभाळणारे प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे (वय ४०) यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. उपजिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला जात असताना हा अपघात घडला.
कर्तव्य बजावतानाच शेवटचा श्वास
प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे हे मूळचे अहिल्यानगरचे रहिवासी होते. पुण्यात प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करण्यासोबतच त्यांच्याकडे निवडणूक कामाचीही जबाबदारी होती. उपजिल्हाधिकाऱ्यांनी आज एक अत्यंत महत्त्वाची SIR बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी रोटे आपल्या दुचाकीवरून जात असताना वाटेतच त्यांच्या वाहनाला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की रोटे यांचा जागीच मृत्यू झाला.
शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा
अवघ्या ४० व्या वर्षी ज्ञानेश्वर रोटे यांचे निधन झाल्याने शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अध्यापन आणि प्रशासकीय जबाबदारी अशा दोन्ही आघाड्यांवर ते सक्रियपणे कार्यरत होते. एका निष्ठावान शिक्षकाचा सरकारी कामावर जात असताना झालेला हा अंत सर्वांच्या मनाला चटका लावून जाणारा ठरला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अपघात नेमका कसा झाला, याची चौकशी सुरू आहे. एका महत्त्वाच्या बैठकीला येण्यापूर्वीच रोटे यांच्यावर काळाने झडप घातल्याने महसूल आणि निवडणूक विभागातही शोक व्यक्त केला जात आहे.


