Ashok Kharat Case : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषण आणि अघोरी कृत्यांचे पडसाद आज राज्याच्या विधिमंडळात उमटले. या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून, खरातसोबत उठबस असलेल्या सर्व बड्या नेत्यांची आणि मंत्र्यांची ‘एचआयव्ही’ (HIV) चाचणी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना अत्यंत गंभीर इशारा दिला. “या भोंदूबाबाला जे जे भेटले आहेत आणि जे व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहेत, त्या सर्वांच्या रक्ताची चाचणी सरकारने तातडीने करून घ्यावी, अन्यथा संसर्गामुळे अनर्थ ओढवेल,” असे खळबळजनक वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले आहे.
“राजकारण्यांना लाज वाटत नाही का?” – भास्कर जाधवांचा प्रहार
या चर्चेदरम्यान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सर्वपक्षीय नेत्यांवर ताशेरे ओढले. “पुरोगामी महाराष्ट्रात लोकप्रतिनिधी अशा भोंदूबाबाच्या नादी लागतात, हे संतापजनक आहे. अशा लोकांचे फोटो समोर आल्यावर त्यांना लाज वाटत नाही का?” असा रोकठोक सवाल त्यांनी केला. तर, ज्यांचे फोटो खरातसोबत आहेत, त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी लावून धरली. याआधीच या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
कोणालाही सोडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली. “हा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न असून या प्रकरणाची कारवाई अचानक झालेली नाही, तर त्याची तयारी आधीपासूनच सुरू होती,” असे त्यांनी सांगितले. मी सरसकट कोणालाही क्लीनचिट देत नाही. या प्रकरणात ज्याचा दुरान्वये संबंध असेल, त्यालाही सोडले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिले. अघोरी शक्तींच्या नावाखाली महिलांचे ‘ब्रेनवॉश’ करून त्यांचे शोषण केल्याचेही त्यांनी नमूद केले.


