पुणे : पुण्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव जाणार्या कारने वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्या शासकीय वाहनाला समोरुन जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंढवा चौकाकडून केशवनगरकडे जाणार्या रोडवर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यामध्ये वाहनचालक तसेच ऑपरेटर किरकोळ जखमी झाले आहे. हिम्मत जाधव असे वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त यांचे नाव आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार शरद पवार यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कारचालक समदिप मनमोहन सिंग (वय-३०, रा. शुभ इवान, मिडोरी वाईन्सजवळ, केशवनगर, मुंढवा, मुळ रा. हरियाना) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिम्मत जाधव यांच्याकडे फिर्यादी शरद पवार हे पोलीस उपायुक्त शासकीय वाहनावर ऑपरेटर म्हणून कर्तव्यास आहेत. मुंढवा येथील कुंभारवाडा येथे गणेश मुर्ती घेण्याकरीता नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
या भागाची पाहणी करण्यासाठी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांना घेऊन वाहनचालक विनोद कोंढाळकर हे त्यांची गाडी चालवत होते. पाहणी करुन झाल्यावर ते केशवनगर येथून मुंढवा चौकाकडे परत जात असताना रोडला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे चालक हा सावकाश गाडी चालवत होता.
दरम्यान, केशवलीला अपार्टमेंटसमोर आले असतानाच समोरुन एक भरधाव वेगाने अल्टो कार आली. मात्र, अल्टो कारचालकाने रोडच्या गर्दीकडे न पाहता जाधव यांच्या गाडीला समोरुन जोरदार धडक दिली. त्यावेळी फिर्यादी यांना झटका बसल्याने त्यांच्या ओठाला तसेच वरच्या बाजुला व दाताला गंभीर दुखापत झाली.
वाहन चालक कोंढाळकर यांचे डोके गाडीच्या दरवाज्यावर आपटल्याने डोक्याच्या उजव्या बाजुला मार लागला. सुदैवाने मागे बसलेले हिम्मत जाधव यांना कसल्याही प्रकारची इजा झाली नाही. कारमध्ये समदिप सिंग हा कार चालवत होता. तर त्याच्या शेजारी मनीषकुमार सुमानकुमार सिंग हा बसलेला होता. दोघेही नशेमध्ये असल्याचे दिसून आले. त्यांना मुंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम करीत आहेत.


