Nashik TCS Case: नाशिकमधील बहुचर्चित ‘टीसीएस’ धर्मांतरण आणि लैंगिक छळ प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या अटकेनंतर एमआयएम (MIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी थेट मैदानात उतरून तिची बाजू सावरली आहे. “हे केवळ धर्मांतरणाचे प्रकरण नसून सुशिक्षित मुस्लिम तरुणांच्या प्रगतीला खिळ घालण्यासाठी रचलेला हा एक सुनियोजित राजकीय डाव आहे,” असा दावा ओवेसी यांनी केला.
‘मिडिया ट्रायल’ कशासाठी?
पत्रकार परिषदेत बोलताना ओवेसी यांनी तपास यंत्रणा आणि तक्रारदारांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तक्रारदार व्यक्ती ही सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून केवळ राजकीय सूडबुद्धीतून हे आरोप लावण्यात आले आहेत. निदा खान कधीच एचआर (HR) विभागात कार्यरत नव्हती आणि तक्रार दाखल होण्यापूर्वीच तिची त्या ठिकाणाहून बदली झाली होती, मग तिला ‘मास्टरमाइंड’ कसे ठरवले जात आहे? असा सवाल ओवेसींनी केला. पोलिसांनी जप्त केलेल्या बुरखा आणि धार्मिक पुस्तकांवरून ओवेसींनी संताप व्यक्त केला. “घरात धार्मिक ग्रंथ असणे किंवा बुरखा मिळणे हा गुन्हा कधीपासून ठरला?” असा रोकठोक प्रश्न त्यांनी विचारला.
‘न्यायदेवतेवर विश्वास, सत्य बाहेर येईल’
भूतकाळातील काही प्रकरणांचा संदर्भ देत ओवेसी म्हणाले की, याआधीही उर्दू साहित्यावरून तरुणांना गोवण्यात आले होते, मात्र न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. निदा खानच्या बाबतीतही कायद्याच्या लढाईत सर्व खोटे आरोप गळून पडतील आणि तिला न्याय मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे पोलीस केवळ एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.


