Ambegaon Heatstroke: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात उष्माघाताचा पहिला संशयित बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कडक उन्हात शेतात कांदा काढणीचे काम करत असताना एका तरुण महिलेला आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे शेतमजूर आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मूळच्या खेड तालुक्यातील सुपेवाडी येथील रहिवासी असलेल्या नकुशा बाळू सुपे (वय ३३) या सध्या आंबेगावमधील आमोंडी येथे कांदा काढणीच्या कामासाठी आल्या होत्या. शुक्रवारी (दि. ८) दुपारच्या सुमारास सूर्य आग ओकत असताना त्या शेतात काम करत होत्या. उन्हाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, काम करता करता त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या जागीच कोसळल्या.
उपचारापूर्वीच प्राणज्योत विझली
नकुशा सुपे कोसळताच सोबतच्या मजुरांनी धाव घेत त्यांना शिनोली येथील खासगी रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना ‘मृत’ घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, हा मृत्यू उष्माघातामुळेच (Heat Stroke) झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
वाढत्या तापमानाचा धोका ओळखून मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शिवाजीराव जाधव यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
- दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात काम टाळा.
- पुरेसे पाणी प्या आणि डोके कापडाने झाकून ठेवा.
- अस्वस्थ वाटल्यास तातडीने सावलीत विश्रांती घेऊन वैद्यकीय मदत घ्या.
जिल्ह्यात उष्माघाताचा धोका वाढला
केवळ आंबेगावच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. तेथे आतापर्यंत उष्माघात सदृश १२ रुग्ण आढळले असून, आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून तालुकानिहाय विशेष ‘उष्माघात कक्ष’ कार्यान्वित केले आहेत.
का ठरतो उष्माघात जीवघेणा?
जेव्हा शरीराचे तापमान अचानक वाढते आणि शरीर स्वतःला थंड करण्यास असमर्थ ठरते, तेव्हा ‘हिट स्ट्रोक’ येतो. याचा थेट परिणाम मेंदू, हृदय आणि किडनीवर होतो. यामुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान होऊ शकते किंवा हृदयावरचा ताण वाढून मृत्यू ओढवू शकतो.


