पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंडजवळच्या अंबिका कला केंद्रात एका राजकीय नेत्याच्या भावाने गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. डान्स सुरू असताना कलाकेंद्रात हा गोळीबार झाला आहे. तसेच गोळीबार करणारा हा एका आमदाराचा भाऊ असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी एकूण तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अंबिका कलाकेंद्रात येथे डान्स सुरु होता. हा डान्स सुरू असतानाच सत्तेतील एका आमदाराच्या भावाने हवेत गोळीबार केल्याचे बोलले जात आहे. तसेच या गोळीबारत नृत्य करणारी तरुणीही जखमी झाल्याची चर्चा आहे. अंबिका कला केंद्रात ही घटना घडली असून यवत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या प्रकरणी पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी प्रतिक्रिया दिली आहे. कलाकेंद्राच्या रूममध्ये फायरींग झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. 21 अथवा 22 जुलै रोजी ही बातमी बाहेर आली होती. याबद्दल आम्हाला काही ठोस माहिती मिळाली नव्हती. 21 जुलैला रात्री 10.30 वाजता हवेत फायर झाल्याची घटना घडली. याप्रकरणी आता अंबिका कलाकेंद्राच्या मालकाने तक्रार दाखल केली आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


