मुंबई: राज्यात सध्या महायुतीचे सरकार सत्तेत आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) हे तिन्ही पक्ष महायुतीच्या रुपात एकत्र आले असून सध्या सत्तेच्या सिंहासनावर विराजमान आहेत. हे तिन्ही पक्ष एकत्र असले तरी त्यांच्यात अंतर्गत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा कायम असते. महायुतीमधील नाराजीही अनेकवेळा वेगवेगळ्या मार्गाने लोकांसमोर आली आहे. दरम्यान, आता महायुतीच्या महामंडळ वाटपाचा एक नवा आणि महत्त्वाचा फॉर्म्यूला समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधला महामंडळ वाटपाचा पेच अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर सुटला आहे. संख्याबळानुसार महायुतीत महामंडळांचे वाटप झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये महायुतीतील मोठा पक्ष असलेल्या भाजपाच्या वाट्याला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33, तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळ या सूत्रावर एकमत झाल्याचे समजत आहे.
महायुतीचे सरकार सत्तेत झाल्यापासून अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. तिन्ही पक्षांतील अनेक नेत्यांनी मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. परंतु, प्रत्यक्ष संधी मात्र दुसऱ्याच नेत्याला दिली गेल्याने तिन्ही पक्षातील काही नेते नाराज आहेत. यामधील काही नेत्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवलेली आहे, तर काही नेत्यांची नाराजी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समोर आली आहे. अशी राजकारणातील नाराजी दूर करण्यासाठी राज्यातील वेगवेगळी महामंडळे फार महत्त्वाची भूमिका निभावत असतात. आता याच महामंडळाच्या वाटपाबाबत नवा फॉर्म्यूला समोर आला असून महायुतीत महामंडळ वाटप ठरले असून या सूत्रानुसार महामंडळ वाटप केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.


