पुणे : प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाला संमती देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य हे तत्त्व वापरून एरोसिटीत भूखंड वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी विमानतळाच्या परिसरात सुमारे सातशे एकर जागा राखीव ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्हा प्रशासनाकडून जमिनीचा परतावा देण्यासाठी लवकरच नोटीस काढण्यात येणार असून, त्यात संमती देण्यासाठी शेतकऱ्यांचा तपशील देण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालय तसेच, पुरंदर प्रांताधिकाऱ्यांचे सासवड येथील कार्यालयात ही संमती स्वीकारण्याची सोय करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार संमती स्वीकारली जाणार असून, त्यानुसार भूखंडाचेही वाटप केले जाणार आहे. त्यामुळे प्रथम संमती देणाऱ्याला मोक्याचा भूखंड मिळणार आहे. कोअर विमानतळ सोडता विमानतळाच्या परिसरात एरोसिटीची स्थापना करून येणार असून त्यात हा विकसित केलेला भूखंड देण्यात येणार आहे.


