लातूर : सोयाबीनसह अन्य पिकांना बाजार भाव मिळत नसल्याने आणि महिनाभरात चार पैसे गाठीशी राहतील म्हणून कव्हा येथील एका शेतकऱ्याने दोन एकरावर कोथिंबीर घेतली. परंतु, कोथिंबिरीचेही भाव पडले. त्यामुळे शेतकऱ्यांने त्या फडावर नांगर फिरविला आहे.
लातूर तालुक्यातील कव्हा येथील शेतकरी देविदास करडे यांनी मागील महिनाभरापूर्वी खरीप हंगामाची पेरणी करण्याऐवजी दोन एकरावर कोथिंबीर घेतली. अत्याधुनिक औषधांची फवारणी करुन आणि वेळोवेळी पाणी देऊन कोथिंबीर चांगली आणली. पण विक्रीच्या वेळी ५० रुपये कॅरेटचा भाव असल्याचे व्यापाऱ्यांनी त्यांना सांगितले. बी, खते, पेरणी आणि फवारणी असा एकूण एकरी २२ हजार प्रमाणे एकूण ४४ हजार रुपये खच् खर्च आला. पण खर्च केलेले पैसेही निघत नसल्याचे शेतकरी देविदास करडे यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी दोन एकरावर अक्षरशः ट्रॅक्टरचा नांगर फिरविला.
४० दिवस कोथिंबिरीची चांगली निगा राखून आणि दिवसरात्र काबाडकष्ट करुन चार पैसे हाताशी येतील या आशेने कोथिंबीर आणली. पण पदरी निराशा आली. त्यामुळे त्यांनी नांगर फिरविला आहे. याप्रमाणेच सर्वच पिकांची अवस्था झाली आहे. कोणतेही पीक घेतली की खर्च अधिक आणि उत्पन्न कमी यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.


