Pune News : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप तयारीला लागली आहे. स्वबळावर 125 नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठका पार पडत आहे. बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीचे रणनीती आखण्यात येत आहे. असे सर्व सुरू असतानाच भाजपकडून काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा पक्षात प्रवेश करवून घेतला जात आहे.
सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहे. बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना निवडणुकीबाबत महत्त्वाच्या सूचना करण्यात येणार आहेत. मात्र यादरम्यान, काँग्रेसमधून भाजपमध्ये होणाऱ्या प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपने स्वबळावर १२५ नगरसेवक निवडून आणण्याचा दावा केला आहे.
मागील २०१७ च्या निवडणुकीत पुण्यात भाजपचे ९७ नगरसेवक निवडून आले होते. त्या विजयाच्या जोरावर भाजपने आता १२५ च टार्गेट ठेवल आहे. २०२५ च्या निवडणुकीत १६५ एकूण जागांपैकी १२५ जागा भाजप जिंकण्याच्या दृष्यीने निवडणूक लढवणार आहे. यासाठी पक्षाने इतर पक्षांमधून अनुभवी उमेदवार आयात करण्यावर भर दिला आहे. त्याला जुन्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. मात्र, त्यांची समजूत काढून नव्या लोकांना पक्षात घेण्यावर बड्या नेत्यांचा विचार आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांचे समजूत काढण्यात वेळ जात असल्याने हे प्रवेश लांबले आहेत अन्यथा हे प्रवेश आजच घडवून आणण्यात येणार होते असे देखील सांगितले जात आहे.


