पुणे: अलीकडेच चर्चेत असलेल्या रिक्षा अपघात प्रकरणावर अखेर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने मौन सोडले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात तिच्या कारचालकाने एका रिक्षाला धडक दिल्यानंतर तिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र, गौतमीने पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा सविस्तर खुलासा केला असून, मी त्या दिवशी घटनास्थळी नव्हते, तरी मला गुन्हेगार ठरवले जात आहे, असे ती म्हणाली. गौतमीने म्हटलं अपघाताच्या दिवशीच माझ्या भावांनी रिक्षाचालकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी ती मदत नाकारली. त्याऐवजी 19 लाख रुपयांची मागणी केली गेली. माझ्याकडे याचे सर्व पुरावे आहेत.
गौतमी म्हणाली, या अपघाताशी माझा काही संबंध नाही. पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून मला क्लीन चीट दिली आहे. तरीसुद्धा काही संघटना आणि लोक मला दोष देत आहेत, माझ्या शोवर बंदी घालण्याची धमकी देत आहेत. माझी बदनामी केली जात आहे. चालकाची चूक झाली हे मी मान्य करते, पण मला या प्रकरणात ओढले जाऊ नये. घटनेच्या वेळी मी मुंबईत होते आणि पोलिसांना सर्व माहिती दिली आहे.
हेही वाचा – गौतमी पाटीलला मोठा दिलासा! अपघात प्रकरणात पुणे पोलिसांकडून ‘क्लीन चीट’
मी काही केले नाही तरी दोष दिला जातो – गौतमी पाटील
गौतमीने समाजमाध्यमांवरील टीकेकडेही लक्ष वेधले. ती म्हणाली, ‘मी नाचले तरी लोक बोलतात, नाही नाचले तरी बोलतात. मला सातत्याने ट्रोल केले जात आहे. माझ्या कामावर आणि माझ्यावर अवलंबून अनेक लोक आहेत. शो बंद पडले, तर त्यांचे नुकसान होईल.
पोलिसांकडून क्लीन चीट
या प्रकरणाची चौकशी करताना पुणे पोलिसांनी घटनेच्या ठिकाणावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून गौतमी त्या वेळी कारमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी तिला निर्दोष ठरवले आहे.


