Kedarnath Temple : हिंदू धर्माचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ मंदिरात आता भाविकांना केवळ भक्तीत तल्लीन होता येणार आहे. मंदिर परिसरातील पावित्र्य जपावे आणि गर्दीचे नियोजन सोपे व्हावे, यासाठी प्रशासनाने मंदिर परिसरात मोबाईल फोन आणि कॅमेऱ्यांच्या वापरावर कायमची बंदी घातली आहे.
रील्सच्या ‘क्रेझ’ला चाप
गेल्या काही काळापासून केदारनाथमध्ये दर्शनापेक्षा मोबाईलवर फोटो काढणे आणि सोशल मीडियासाठी ‘रील्स’ बनवण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे मंदिराच्या पुरातन परंपरांना बाधा येत असून रांगेत उभ्या असलेल्या इतर भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. या वाढत्या ‘डिजिटल’ गोंधळाला लगाम घालण्यासाठी मंदिर समितीने हा कठोर निर्णय घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाचा कडक इशारा
रुद्रप्रयागचे जिल्हा दंडाधिकारी प्रतीक जैन यांनी स्पष्ट केले आहे की, यावेळेस केवळ नियम बनवले नसून त्यांची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे केली जाईल. जे भाविक चोरून फोटो काढतील किंवा व्हिडिओ बनवतील, त्यांच्यावर जागेवरच दंडात्मक कारवाई केली जाईल. मंदिर परिसरात सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षकांद्वारे विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
भाविकांच्या फोनसाठी ‘लॉकर’ सुविधा
फोन बंदीमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन पर्यायी व्यवस्था करत आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षित लॉकर उभारण्याचे नियोजन सुरू आहे. भाविक तिथे आपले फोन जमा करून शांतचित्ताने दर्शन घेऊ शकतील आणि दर्शन झाल्यावर आपले फोन परत घेऊ शकतील.


