Tiroda School Accident: एका बाजूला उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय यंत्रणेचा अक्षम्य निष्काळजीपणा. या संघर्षात तिरोडा येथील एका ११ वर्षीय निष्पाप चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. तिरोडा नगर परिषद संचलित पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळेचे लोखंडी प्रवेशद्वार अंगावर कोसळल्याने पाचवीत शिकणाऱ्या निराली मनीष चाफले या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नेमकी घटना काय?
नेहमीप्रमाणे शनिवारी (११ एप्रिल) दुपारी १ वाजता शाळा सुटली. विद्यार्थी आनंदाने घराकडे जाण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ जमले होते. मात्र, अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेले आणि गंजलेले शाळेचे मुख्य गेट अचानक निखळले आणि थेट निरालीच्या अंगावर पडले. अवजड गेटखाली दबली गेल्याने निराली गंभीर जखमी झाली. तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात व नंतर गोंदियाला हलवण्यात येत होते, मात्र वाटेतच तिची प्राणज्योत मालवली.
आईच्या डोळ्यांसमोरच काळाचा घाला
या घटनेचा सर्वात क्लेशदायक पैलू म्हणजे, निरालीची आई शुभांगी चौधरी चाफले या त्याच शाळेत मुख्याध्यापिका म्हणून सेवा बजावत आहेत. आपल्याच शाळेच्या आवारात आणि डोळ्यांदेखत लेकीचा असा अंत झाल्याने मातेसह संपूर्ण शिक्षकवृंद सुन्न झाला आहे. निराली ही केवळ एक विद्यार्थिनी नव्हती, तर ती तिरोडा तालुक्याचा अभिमान होती. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत तिने महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावून आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली होती. काही दिवसांपूर्वीच पुण्यात तिचा गौरव झाला होता. अशा गुणवान मुलीचा एका पडक्या गेटमुळे मृत्यू झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जबाबदार कोण?
शाळेचे प्रवेशद्वार धोकादायक स्थितीत असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका आता नागरिकांनी ठेवला आहे. “प्रशासनाने वेळेत दुरुस्ती केली असती तर आज निराली आपल्यात असती,” अशा भावना स्थानिक व्यक्त करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरत आहे.


