Sharad Pawar: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आज नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली असून, काँग्रेसने ही निवडणूक लढवू नये आणि ती बिनविरोध करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
काँग्रेसच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, “काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष असून त्यांना काय करावे हे सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही. परंतु, बारामतीची ही जागा एका दुर्दैवी अपघातामुळे रिक्त झाली आहे. महाराष्ट्रातील एका कर्तृत्ववान प्रतिनिधीचे (अजित पवार) निधन झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. अशा वेळी ही निवडणूक बिनविरोध करणेच योग्य ठरेल, असा सल्ला मी काँग्रेसला देईन. मात्र, अंतिम निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे.”
काँग्रेसच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष
बारामतीत महायुतीकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहेत, तर काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवार यांनी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून विनंती केली आहे. मात्र, काँग्रेसने अद्याप माघार घेतलेली नाही. “निवडणूक लढवण्याचा निर्णय दिल्लीतून (हायकमांड) झाला असल्याने, माघारीबाबतही तिथूनच चर्चा करावी लागेल,” असे स्पष्टीकरण काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आले आहे.
सुप्रिया सुळेंची सावध भूमिका
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी या विषयावर भाष्य करताना म्हटले की, “निवडणुकीच्या बिनविरोध प्रक्रियेबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. काँग्रेस नेते यावर काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. कौटुंबिक सल्ला द्यायचा झाल्यास तो मी घराच्या चार भिंतीत देईन, कॅमेऱ्यासमोर नाही.” अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आता राजकीय सुसंस्कृतपणा जपला जाणार की निवडणूक होणार, याचे उत्तर आज संध्याकाळपर्यंत मिळेल.


