Pune Metro: पुणे मेट्रोने शहरातील वाहतूक सुरळीत आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. बेंगळुरू-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक जंक्शनवर ५०८ मीटर लांबीचा फूट-ओव्हर-ब्रिज (FOB) उभारण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. हा पूल वनाझ-चांदणी चौक मेट्रो विस्तार प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असेल.
पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवेशमार्ग
हा परिसर पुण्यातील सर्वात गजबजलेल्या जंक्शनपैकी एक असून, बेंगळुरू, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेस तसेच हिंजवडी, चाकण आणि पिरंगुटच्या औद्योगिक भागांत जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रमुख ट्रान्झिट कॉरिडॉर आहे. या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोने चांदणी चौक परिसरात महामार्गावरील बस स्थानकांपासून मेट्रो स्टेशनपर्यंत थेट, सुरक्षित आणि सुकर पादचारी प्रवेश मिळावा म्हणून हा ब्रिज उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – Pune Metro: पुणे मेट्रोसाठी EIB कडून 49.5 दशलक्ष युरोचा निधी मंजूर
वनाझ-चांदणी चौक विस्ताराचा भाग
वनाझ ते चांदणी चौक हा विस्तार सुमारे १,१२३ मीटर लांबीचा असेल. यात कोथरूड येथे डेपो आणि चांदणी चौक येथे नवे मेट्रो स्थानक उभारले जाणार आहे. या नव्या पुलामुळे प्रवाशांचा चालण्याचा वेळ कमी होणार असून, गर्दीच्या ठिकाणी प्रवास अधिक सुरक्षित होईल, असे मेट्रो अधिकाऱ्यांनी सांगितले.
अद्याप नियोजनाच्या टप्प्यावर काम
सध्या प्रकल्प अभियांत्रिकी आणि मंजुरीच्या टप्प्यात असून, सविस्तर रचना आणि बांधकाम प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच निश्चित होणार आहे. पुणे मेट्रोच्या म्हणण्यानुसार, हा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या पश्चिम भागातील कनेक्टिव्हिटी वाढेल आणि राष्ट्रीय महामार्गावर पादचाऱ्यांची गर्दी तसेच अपघाताचा धोका लक्षणीयरीत्या कमी होईल.


