Pune Metro: युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेने (EIB) भारताच्या शाश्वत शहरी वाहतुकीसाठी मोठा आर्थिक पाठिंबा जाहीर केला आहे. पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 49.5 दशलक्ष युरो पूरक कर्ज आणि नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 240 दशलक्ष युरो कर्ज मंजूर करण्यात आले आहे. ही गुंतवणूक EIB च्या आधीच्या 600 दशलक्ष युरो निधीव्यतिरिक्त आहे, ज्यामुळे पुणे मेट्रोच्या दोन मुख्य कॉरिडॉरना (PCMC–स्वारगेट आणि वनाझ–रामवाडी) बळकटी मिळाली आहे. 33.2 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर 30 स्थानके आणि 102 अत्याधुनिक मेट्रो कार कार्यरत आहेत.
पुणे मेट्रोने मार्च 2022 पासून आजपर्यंत 100 दशलक्षाहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण दोन्ही कमी झाले आहेत. EIB च्या नव्या निधीमुळे नेटवर्क विस्तार, ऊर्जा कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये आणखी सुधारणा होणार आहे. तथापी, नागपूर मेट्रो विस्तार प्रकल्पामुळे नेटवर्कची लांबी दुप्पट होईल. या टप्प्यामुळे 2041 पर्यंत वाहतुकीशी संबंधित कार्बन उत्सर्जन 22 टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे आणि दैनंदिन प्रवासी संख्या 75 टक्क्यांनी वाढेल.
EIBच्या उपाध्यक्षा निकोला बीअर यांनी सांगितले, नागपूर आणि पुणे मेट्रो दोन्ही उपक्रम भारतातील हरित संक्रमणासाठी आमचा दृढ पाठिंबा दर्शवतात. या गुंतवणुकीमुळे स्वच्छ हवा, सुरक्षित प्रवास आणि लाखो लोकांसाठी जलद कनेक्शन शक्य होईल. EIB ने युरोपियन युनियनच्या ग्लोबल गेटवे धोरणांतर्गत 2016 पासून भारताला वाहतुकीसाठी 3.6 अब्ज युरोहून अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे भारत हा युरोपबाहेर EIB चा सर्वात मोठा वाहतूक भागीदार ठरला आहे.


