Maharashtra Farmer Loan : महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्याची तयारी सुरू केली असून, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 30 जूनपूर्वी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. सहकार विभागाने यासंदर्भातील सविस्तर माहिती सरकारकडे सादर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या कर्जदारांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे 34 ते 35 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगितले जात आहे.
कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार विभागाने विविध बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे. यात कर्ज रक्कम, खाते तपशील, आधार क्रमांक, जमीन नोंदी, परतफेडीची माहिती आणि पीककर्जाचा तपशील यांचा समावेश आहे.
सध्या सरकारकडून अंतिम निकष निश्चित करण्याचे काम सुरू असून मे अखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही सरकार प्रोत्साहनपर अनुदानाचा विचार करत आहे. वेळेत कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


