Nashik Crime : नाशिक पोलिसांच्या क्राइम ब्रांचने एका गंभीर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. स्वघोषित ‘कॅप्टन’ आणि ज्योतिषी म्हणून ओळखले जाणारे अशोक खरात याला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी असून, नंतर ज्योतिष आणि विश्वशास्त्राच्या क्षेत्रात सक्रिय आहे. तो शिवनिका ट्रस्टचे नेतृत्व करतो आणि अनेक राजकीय नेते, मंत्री तसेच नामांकित व्यक्तींचे भविष्य सांगत असल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणात ३५ वर्षीय महिलेने अशोक खरातवर बलात्काराचा आरोप केला होता. गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला असून, क्राइम ब्रांच युनिट-१ ने तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून ५८ व्हिडिओ जप्त केले आहेत. या व्हिडिओंमध्ये नामांकित महिला, सेलिब्रिटी, वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांच्या क्लिप्स असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडून या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू असून, त्यातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक खरातने मर्चंट नेव्हीमध्ये २२ वर्षे सेवा केली असून, १५४ देशांचे दौरे पूर्ण केले आहेत. निवृत्तीनंतर त्याने ज्योतिष क्षेत्रात प्रवेश केला आणि राजकीय वर्तुळात चांगले संबंध जोडले. या अटकेमुळे नाशिकसह राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुढील तपास क्राइम ब्रांचकडेच सुरू आहे.


