Aapli ST App: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने (एमएसआरटीसी) प्रवाशांसाठी एक मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ‘आपली एसटी’ नावाचे नवे मोबाईल अॅप लाँच करण्यात आले असून, यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतुकीत क्रांतिकारी बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हे अॅप रोझमाल्टा ऑटोटेक लिमिटेडच्या सहकार्याने विकसित करण्यात आले असून, यामार्फत महाराष्ट्रातील 12 हजारांहून अधिक बसेसचे रिअल-टाईम ट्रॅकिंग करता येणार आहे.
काय आहे खास?
हे अॅप जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित असून, प्रवाशांना त्यांच्या बसेस अचूक वेळेत कुठे आहेत याची माहिती मिळेल. थांब्यांवर अनावश्यक प्रतीक्षा कमी होईल आणि प्रवास अधिक विश्वासार्ह होईल. प्रवाशांना बस थांबे, वेळापत्रक, मार्ग यांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, ‘आपली एसटी’ अॅप हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांच्या सोयीसाठी तयार करण्यात आले आहे. यात सेवा किंवा तिकीट क्रमांकाद्वारे बस ट्रॅकिंग, जवळचा बस स्टॉप लोकेटर, थांब्यांवरील रिअल-टाईम डिपार्चर (STD) आणि अंदाजे आगमन वेळा (ETA) अशी महत्त्वाची वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत एका क्लिकवर संपर्क साधण्याची सोयही यात उपलब्ध आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचे बदल
- लाइव्ह ट्रॅकिंग – बसचे अचूक लोकेशन पाहता येईल.
- जवळचा बस स्टॉप – वापरकर्त्याच्या लोकेशननुसार जवळील एसटी स्टॉप शोधता येईल.
- वेळापत्रक माहिती – दोन थांब्यांमधील मार्ग व वेळापत्रक मिळेल.
- आपत्कालीन सुविधा – अॅपमध्ये महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध.
- अँड्रॉइड व आयओएसवर उपलब्धता – सर्व वापरकर्त्यांसाठी प्रवेश.
सध्या उपलब्ध असलेले MSRTC कम्युटर अॅप लवकरच ‘आपली एसटी’ नावाने ओळखले जाणार आहे. पुढील अपडेट्समध्ये ऑनलाइन तिकीट बुकिंगची सोयही यात समाविष्ट केली जाणार आहे.
सरकारने नागरिकांना त्यांचे अभिप्राय व सूचना देण्यासाठी प्रोत्साहित केले असून, यामुळे अॅपमध्ये सातत्याने सुधारणा केल्या जातील. या उपक्रमामुळे राज्यातील प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे.


