पुणे: कोथरूडमधील गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्यानंतर चर्चेत आलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पोलिस कारवाई सुरू असताना तो पत्नी आणि मुलासह युरोपला निघून गेला होता. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी नवा खुलासा करत घायवळ आणि त्याच्या पत्नीच्या नावावर एकाचवेळी दोन वेगळ्या मतदारसंघांत चार मतदान ओळखपत्रे असल्याचे समोर आणले आहे.
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात निलेश आणि त्याची पत्नी स्वाती घायवळ यांच्या नावावर प्रत्येकी दोन मतदान ओळखपत्रे नोंदवली गेल्याचे आढळले आहे. त्यात वय, नाव आणि आडनावात फेरफार केल्याचे धक्कादायक वास्तवही उघडकीस आले.
हेही वाचा – Pune Crime: कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ स्विझर्लँडला पळाला; पोलिसांनी 10 बँक खाती गोठवली
नावे व कार्ड क्रमांक:
- निलेश बन्सीलाल गायवळ (कोथरूड) – ओळखपत्र क्र. DRD1360288 (वय 47)
- निलेशकुमार गायवळ (कर्जत-जामखेड) – ओळखपत्र क्र. TKM8217994 (वय 48)
- स्वाती निलेश गइवाल (कोथरूड) – ओळखपत्र क्र. SAO7387947 (वय 42)
- स्वाती निलेश घायवळ (कर्जत-जामखेड) – ओळखपत्र क्र. TKM8218026 (वय 33)
कर्जत-जामखेड मतदारसंघातील या दोन कार्डांची नोंद सलग क्रमांकाने (297 आणि 298) झालेली दिसते. म्हणजेच एकत्रित पद्धतीने नावनोंदणी केली गेली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या प्रकरणावर बोलताना आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार म्हणाले की, एकाच कुटुंबाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या नावांनी मतदार कार्डे मिळवली आहेत. हे अत्यंत गंभीर असून निवडणूक आयोगाच्या यंत्रणेतील त्रुटी उघड करणारे आहे. घायवळ दाम्पत्याने कधी ‘गायवळ’, तर कधी ‘गइवाल’ अशी आडनावे बदलली आहेत. वयामध्येही मोठे फरक दाखवले आहेत. ही उघडकीस आलेली घटना अपवाद नसून अशा हजारो नोंदी महाराष्ट्रभर असण्याची शक्यता आहे. याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.


