पुणे: सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न अनेकांच्या डोळ्यात असते. पण शिपाई असो वा अधिकारी पद, एका जागेसाठी हजारो अर्जदारांची स्पर्धा असते. विशेषतः एमपीएससीच्या परीक्षेत ही तीव्र चुरस दिसून येते. त्यातच, उमेदवारांना अनुकंपा नियुक्त्यांसाठीही अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, अखेर ही प्रतिक्षा संपली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक वर्षांपासून रखडलेली प्रकरणे मार्गी लागली आहेत. येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना आणि 5122 एमपीएससी परीक्षेतून निवड झालेल्यांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. म्हणजेच, एकाच दिवशी 10,309 तरुणांना शासकीय सेवेत प्रवेश मिळणार आहे. राज्यात यापूर्वी असा उपक्रम झालेला नाही.
हेही वाचा – जिल्हा परिषद शिक्षकातून ‘केंद्र प्रमुख’ पदांवर नियुक्तीसाठी डिसेंबरमध्ये ऑनलाईन परीक्षा
अनुकंपा तत्त्वानुसार सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नोकरीची संधी दिली जाते. मात्र तांत्रिक कारणांमुळे अनेक अर्ज प्रलंबित होते. फडणवीस यांनी या संवेदनशील प्रश्नाला प्राधान्य देत सामान्य प्रशासन विभागाला थेट निर्देश दिले. त्यानंतर नवीन धोरण तयार करण्यात आले आणि नियुक्ती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला.
अनुकंपाधारक उमेदवारांचा अनुशेष संपणार! 5187 उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लागली असून येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 1, 2025
हेही वाचा – CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर
या निर्णयामुळे केवळ शासकीय कुटुंबीयांनाच दिलासा मिळणार नाही, तर राज्यातील युवकांसाठीही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. विभागनिहाय पाहता कोकणातील 3078 उमेदवारांची संख्या सर्वाधिक असून, त्यापाठोपाठ विदर्भातील 2597, मराठवाड्यातील 1710, पुणे विभागातील 1674 आणि नाशिक विभागातील 1250 उमेदवारांचा समावेश आहे. हा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 आणि 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा उपक्रमातील एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


