Parbhani Crime: परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 14 ऑक्टोबर रोजी भोगाव देवी संस्थान इटोली परिसरात एका तरुणीवर सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी या अत्याचाराचा व्हिडिओ देखील चित्रीत केला होता. या घटनेने संपूर्ण परभणी जिल्हा हादरला असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व सहा आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत झाडाखाली बसून बोलत असताना करण, शेषेराव, साबेर, मुन्या, अर्जुन आणि लखन हे सहा जण अचानक तिथे आले. अर्जुन आणि लखन यांनी तरुणाला पकडून ठेवले, तर करण, शेषेराव आणि साबेर यांनी तरुणीवर अत्याचार केला. या घटनेचा व्हिडिओ तयार करून आरोपींनी तरुणीकडून 5,000 रुपये उकळले.
हेही वाचा – शिवसेना नेत्याच्या मुलाचं धक्कादायक कृत्य; सार्वजनिक शौचालयात १६ वर्षीय मुलीवर बलात्कार
घटनेची माहिती मिळताच जिंतूर पोलिसांनी विशेष पथक तयार करून तातडीने सर्व आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी IPC कलम 376(1), 126(1), 310 आणि IT Act 2000 च्या कलम 66(E) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणारच. पण समाजानेही जागरूक राहणे गरजेचे आहे. मुलींनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन विनीवाल यांच्या नेतृत्वाखाली आठ विशेष पथकांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांकडे व्हिडिओ आणि इतर पुरावे असून, आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


