शिरूर: जवळपास तीन वर्षे उशिरा जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकीत पाबळ गट सर्वसाधारण गटासाठी खुला आल्याने सर्वपक्षीय इच्छुकांची यादी मोठी वाढली आहे. गेले दोन महिने हा गट खुल्या प्रवर्गासाठी येणार म्हणून पूर्ण तयारीने उतरलेले वढु बुद्रुक (ता.शिरूर) येथील माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी आयोजित केलेल्या उज्जैन यात्रेने गटातील १४ ही गावात वातावरण अक्षरश: ढवळून निघाले आहे. त्यांच्याच नावाची चर्चा सर्वत्र पहायला मिळत आहे. त्यांच्या या यात्रेचा आत्तापर्यंत १5 हजार नागरिकांना लाभ घेतला आहे.
राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षांमध्ये हलचाली सुरू
गेल्या अनेक वर्षानंतर पाबळ-केंदूर गट हा सर्वसाधारण म्हणून जाहीर झाला आहे. ओबीसी, महिला अशा आरक्षणाने या गटात येथील सर्वसाधारण इच्छुकांच्या इच्छाच मेल्या होत्या. मात्र, यावेळी पाबळ गट सर्वसाधारण गटासाठी खुला आल्याने मोठ्या संख्येने इच्छुक इथे दिसत आहेत. त्यातच राज्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे झालेले दोन गट, भाजपाची स्वतंत्र राजकीय व्युहरचना हे सर्व पाहता, आगामी निवडणूक युती वा महाआघाडी अशी होणार? की निवडून येईल तो आपला अशा पध्दतीने युती-आघाडीने सर्वांनाच खुली सुट दिल्यास या गटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि भाजप अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गटात इच्छुकांपैकी कोण-कोणाकडून उभे राहील, याची शाश्वती सध्या तरी नाही हेच या वेळीच्या निवडणूकीचे वैशिष्ट्य आहे.
इच्छूकांची यादी…
इच्छूकांच्या यादीत माजी सभापती प्रकाश पवार, सुभाष उमाप, जिल्हा बॅंकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे, माजी उपसभापती सविता पऱ्हाड, माजी सरपंच प्रमोद पऱ्हाड, माजी सभापती शंकर जांभळकर, माजी सरपंच सतीश थिटे, सनी थिटे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके व शिरुर बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र बापूसाहेब थिटे यांची नावे आहेत. या इच्छुकांमधून अंतीम लढाईत कोण उतरणार? आणि त्यांचे पक्ष कोणते असणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
प्रफुल्ल शिवले यांचे नाव चर्चेत
राष्ट्रवादीकडून प्रकाश पवार व प्रमोद पऱ्हाड हे प्रमुख इच्छुक आहेत, तर भाजपकडून जयश्री पलांडे, भगवानराव शेळके यांनी आपल्या इच्छा व्यक्त केल्या आहेत. शरदचंद्र पवार गटाकडून सनी थिटे, शंकर जांभळकर हे दोघे असून उर्वरित इच्छुक हे राष्ट्रवादीकडून आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चेत आलेले प्रफुल्ल शिवले हे नेमके कोणत्या पक्षाकडून उभे राहतील, याबाबत कुणालाही काहीही अंदाज लागत नसल्याने पाबळ-केंदूर गटात आपापल्या पक्षाची उमेदवारी देताना नेत्यांचीच कसोटी जास्त लागणार असे चित्र आहे.
मागील पराभव अन् सहानुभूती हेच बळ
मागील जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूकीत प्रफुल्ल शिवले हे केंदूर गटातून केवळ ११ मतांनी पराभूत झाले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत युवा शक्ती असताना हा पराभव त्यांचेसाठी बोचणारा होता. मात्र या पराभवाची त्यांना पाबळ-केंदूर गटात प्रचंड सहानुभूती असून गटातील महिलांच्या मागणीनुसार त्यांनी खास महिलांसह जेष्ठांसाठी उजैन-महाकाल यात्रा सुरू केली. तब्बल १5 हजार भाविकांना त्यांनी ही यात्रा घडविल्याने गटात त्यांच्या नावाची चर्चा प्रत्येक वाडीवस्तीवर आहे


