Sanjay Raut Hospitalized: मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आज अचानक अस्वस्थता जाणवल्याने तातडीने भांडुपमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी रुग्णालयात रक्त तपासणी केली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. संजय राऊत यांना नेमका काय त्रास होत आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, त्यांचे अहवाल आल्यानंतरचं त्यांच्या प्रकृतीसंदर्भात अधिक माहिती मिळू शकेल.
सकाळीच संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली, जिथे त्यांनी राज ठाकरे यांच्या इच्छेनुसार महाविकास आघाडीतील काँग्रेसला पक्षासोबत ठेवणे आवश्यक आहे, असे वक्तव्य केले. या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले.
दरम्यान, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडी तयार केल्यानंतर संजय राऊत सातत्याने ठाकरे गटाचा अजेंडा प्रभावीपणे मांडत आहेत. दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन ते सत्ताधाऱ्यांवर टीका करतात. त्यांच्या या टीकेला प्रतिसाद देण्यासाठी महायुतीने अनेक नेत्यांची फौज तैनात केली असली, तरी राऊतांच्या प्रभावी नेतृत्वाखाली विरोधकांचा सामना होत राहतो.


