Pune Accident: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात भरधाव टँकरच्या वेगाचा बळी जाण्याचे सत्र थांबायला तयार नाही. मंगळवारी सकाळी वानवडी परिसरात एका भीषण अपघातात ग्रेसिया डॅनियल इसा (वय 24) या तरुण महिला इंजिनिअरला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून, शहरातील रस्ते सुरक्षिततेचा आणि अनियंत्रित जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कामावर जाताना काळाचा घाला
केदारीनगर भागात राहणारी ग्रेसिया एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती. मंगळवारी सकाळी 7:30 च्या सुमारास कामावर जाण्यासाठी ती आपल्या दुचाकीवरून निघाली होती. गंगा सॅटेलाईट परिसरातील नाल्यावरील पुलाजवळ असलेल्या वळणावर एका भरधाव पाण्याच्या टँकरने तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ग्रेसिया रस्त्यावर पडली आणि टँकरचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच करुण अंत झाला. स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र त्यापूर्वीच तिने प्राण सोडले होते.
टँकर चालकाचे पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण
या भीषण अपघातानंतर टँकर चालक संतोषकुमार मोर्या (वय 45) याने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. वानवडी पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले असून, त्याच्यावर हलगर्जीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेग आणि चालकाचे वळणावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पुणेकरांचा संताप: ४८ तासांत दुसरा बळी
पुण्यात गेल्या 48 तासांत टँकरच्या धडकेमुळे मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. अरुंद रस्ते, धोकादायक वळणे आणि टँकर चालकांचा बेदरकारपणा यामुळे सामान्यांचे जीव जात असल्याचा आरोप पुणेकर करत आहेत. “सकाळी घराबाहेर पडलेला तरुण रात्री सुखरूप घरी परत येईल का?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. जड वाहनांच्या वेळेवर आणि वेगावर पोलिसांनी कडक निर्बंध घालावेत, अशी मागणी जोर धरत आहे.


