Pune Waterpark Accident: पुणे जिल्ह्यातील मोराची चिंचोली (Morachi Chincholi) येथे असलेल्या जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रातील वॉटरपार्कमध्ये व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणामुळे गंभीर दुर्घटना घडली आहे. सहलीसाठी आलेल्या एका महिलेचा वॉटर स्लाइडवर अपघात होऊन तिचे अर्धे शरीर कायमस्वरुपी निकामी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अश्विनी संदीप नप्ते (वय 37) असं संबंधित महिलेचं नाव असून त्यांच्यवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्लाइडवरील पाण्याची पातळी कमी
करंदी येथील अश्विनी संदीप नप्ते या आपल्या कुटुंबासह मोराची चिंचोली येथील वॉटरपार्कमध्ये सहलीसाठी गेल्या होत्या. वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी अत्यंत कमी असल्याने त्या जोरात खाली आपटल्या आणि जागीच बेशुद्ध पडल्या.
वेळेवर उपचार न मिळाल्याने स्थिती गंभीर
घटनेनंतर तातडीची वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईकांना त्यांना खासगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करावे लागले. तपासणीत त्यांच्या पाठीचे चार मणके तुटल्याचे समोर आले असून डॉक्टरांनी त्यांचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी महिलेचे नातेवाईक किरण नप्ते यांच्या फिर्यादीवरून शिरुर पोलीस ठाण्यात वॉटरपार्कचे मालक आणि व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षेवर गंभीर प्रश्न
या घटनेमुळे वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत असून प्रशासनाने याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.


