Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील ‘चॅलेंज वॉर’ने जोर धरला आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरून केलेल्या आव्हानाला मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले असून, आता थेट १ लाख रुपयांची पैज लावली आहे. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत फडणवीस यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.
काय होते ठाकरेंचे आव्हान?
काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना डिवचले होते. पंतप्रधान मोदींपासून ते त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत कुणीही हिंदू-मुस्लिम उल्लेख न करता विकासावर भाषण करून दाखवावे, असे भाषण दाखवणाऱ्यास मी १ लाख रुपये देईन, असे आव्हान ठाकरेंनी दिले होते.
फडणवीसांचा पलटवार
ठाकरेंच्या या आव्हानाचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, मुंबई वगळता इतर कोणत्याही महापालिकेच्या निवडणुकीतील माझी भाषणे काढून पहा. मी ९० टक्के विकासावर आणि फक्त १० टक्के विरोधकांना उत्तरे देण्यासाठी बोलतो. माझी कोणतीही चार भाषणे ठाकरेंना नेऊन द्या आणि त्यांच्याकडून माझे १ लाख रुपये घेऊन या. इतकेच नाही तर, फडणवीसांनी ठाकरेंना ‘७ हजार रुपयांचे प्रतिआव्हान’ दिले आहे. उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यावर केलेले एक तरी भाषण दाखवावे, मी त्यांना ७ हजार रुपये देईन, असा टोलाही त्यांनी लगावला.
कोस्टल रोडच्या कामावरून सुरू असलेल्या श्रेयवादावर फडणवीसांनी सविस्तर भाष्य केले. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या दाव्यांमधील हवा काढून घेताना काही महत्त्वाचे खुलासे केले. कोस्टल रोडची संकल्पना जुनी असली तरी, केंद्रातील पर्यावरण विभागाच्या परवानग्या मिळवणे सर्वात कठीण होते. मी मुख्यमंत्री असताना सतत पाठपुरावा करून या परवानग्या मिळवल्या. केंद्राने २५० एकर जमिनीवर बांधकाम करण्याची अट घातली होती, परंतु मी प्रतिज्ञापत्र देऊन तिथे फक्त मैदाने आणि मोकळी जागा असेल, असे स्पष्ट केले. मी सर्व परवानग्या आणल्या, पण एक दिवस मला न कळवता उद्धव ठाकरेंनी कोस्टल रोडचे भूमीपूजन उरकून घेतले. महापालिका आयुक्तांनी मला विचारले असता, मी श्रेयवादात न पडता त्यांना उद्घाटन मीच करेन असे सांगितले होते, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला.


