Sanjana Chavan Pregnant: ‘बिग बॉस मराठी ५’ चा विजेता आणि प्रेक्षकांचा लाडका ‘गुलिगत’ स्टार सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. सूरजची पत्नी संजना चव्हाण हिने शेअर केलेल्या एका हृदयस्पर्शी व्हिडिओमुळे या आनंदाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
संजनाच्या ‘त्या’ व्हिडिओने वाढवली उत्सुकता
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संजनाने तिचे नवीन फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले. या व्हिडिओमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टींनी चाहत्यांचे लक्ष वेधले. नेटकऱ्यांच्या मते, संजनाने नेसलेल्या साडीत तिचा ‘बेबी बंप’ स्पष्टपणे दिसून येत आहे. संजनाने या पोस्टला एक अतिशय हळवा ऑडिओ जोडला आहे. “अजून तू माझ्या पोटात आहेस, पण मी तुझ्या प्रत्येक हालचालीला ओळखते… तुझ्या पहिल्या श्वासासाठी मी आतुर आहे,” या संवादाने ती आई होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
लग्नानंतरच्या अल्प कालावधीतच गोड बातमी
सूरज आणि संजना यांचा विवाह मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पार पडला होता. संजना ही सूरजच्या मामाची मुलगी असून, लग्नानंतर हे जोडपे त्यांच्या नवीन घरात आनंदाने संसार करत आहे. लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांनंतरच ही ‘गुड न्यूज’ समोर आल्याने चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या या जोडीने अद्याप अधिकृतपणे यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, संजनाच्या पोस्टमधील तो खास ‘डोहाळे जेवण’ स्टाईलचा ऑडिओ सर्व काही सांगून जात आहे. आता चव्हाण कुटुंबात छोटा पाहुणा कधी येतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


