Arvind Kejriwal: आम आदमी पक्षाचे (AAP) चाणक्य मानले जाणारे राघव चढ्ढा आणि इतर खासदारांनी ‘कमळ’ हाती घेतल्याने दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. या धक्कादायक पक्षांतरावर अखेर ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आपली पहिली अधिकृत आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेचा विश्वासघात केला आहे,” अशा शब्दांत केजरीवाल यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
केजरीवालांचा ‘X’ वरून प्रहार; जनतेचा अपमान झाल्याचा दावा
पक्षाच्या खासदारांनी साथ सोडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, भाजप केवळ आम आदमी पक्ष फोडत नसून, पंजाबच्या जनतेने दिलेल्या पवित्र मतांचा हा घोर अपमान आहे. ‘आप’ला कमकुवत करण्यासाठी भाजपकडून सातत्याने लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या प्रतिनिधींची शिकार केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
१० पैकी ७ खासदार फुटले
या बंडाची व्याप्ती अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राघव चढ्ढा आणि संदीप पाठक यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना ‘आप’च्या गोटात मोठी खिंडार पाडली आहे. ‘आप’च्या एकूण १० राज्यसभा खासदारांपैकी तब्बल ७ खासदारांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे.यामध्ये माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि महिला नेत्या स्वाती मालीवाल यांचाही समावेश असल्याने केजरीवाल यांना संसदेत मोठा धक्का बसला आहे.
बीजेपी ने फिर से पंजाबियों के साथ किया धक्का
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 24, 2026
पक्षाचे अस्तित्व धोक्यात?
दोन-तृतीयांश सदस्य सोबत असल्याने राघव चढ्ढा यांनी तांत्रिकदृष्ट्या पक्षाच्या अपात्रतेच्या कारवाईला बगल दिली आहे. सात खासदारांनी एकाच वेळी गट बदलल्यामुळे राज्यसभेत ‘आप’चे संख्याबळ आता नाममात्र उरले आहे. एका बाजूला भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना आणि दुसरीकडे स्वतःच्या खासदारांचे पलायन, अशा दुहेरी संकटात अरविंद केजरीवाल अडकले आहेत. खासदारांच्या या सामूहिक पक्षांतरामुळे केवळ दिल्लीच नाही, तर पंजाबमधील राजकीय समीकरणेही वेगाने बदलण्याची शक्यता आहे. केजरीवाल आता या गळतीला कसे रोखतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


