Solar Power Project On Samruddhi Highway: समृद्धी महामार्ग आता केवळ जलद प्रवासापुरता मर्यादित न राहता ऊर्जा निर्मितीचेही केंद्र ठरत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या महामार्गावरील इंटरचेंजेसवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत 204 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीची योजना असून, सोमवारी जवळपास 5 मेगावॅट वीज निर्माण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे महामंडळाला टोलशिवाय आणखी एक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होणार आहे.
सौर उर्जेचा उपयोग कसा होणार?
कॉर्पोरेशनमधील सूत्रांनी सांगितले की, या प्रकल्पांतून मिळणारी वीज मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ बोगदा तसेच समृद्धी महामार्गावरील विविध बोगद्यांमधील प्रकाशयोजनासाठी वापरली जाणार आहे. 701 किमी लांबीच्या या महामार्गावर आतापर्यंत 1.25 कोटींपेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे.
पहिला टप्पा सुरू
पहिल्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंजेसवर 9 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कारंजा लाड येथे 3 मेगावॅट तर मेहकर येथे 2 मेगावॅट वीज निर्मिती सुरू झाली आहे.
दरम्यान, MSRDC चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदाल यांनी सांगितले की, ‘समृद्धी महामार्गावरील हा सौर ऊर्जा प्रकल्प आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. भविष्यात इतर प्रस्तावित एक्सप्रेसवेच्या इंटरचेंजेसवरही असेच प्रकल्प राबवण्याचा मानस आहे.’ या प्रकल्पाचा वीज वापर MSRDC च्या उपकंपनी महासमृद्धी रिन्युएबल एनर्जी लि. व MSEDCL यांच्यातील करारानुसार केला जाणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी फ्रीडर योजनेत सहभागी होऊन प्रतियुनिट अंदाजे 3 रुपये दराने वीज खरेदी केली जाईल.
पवन ऊर्जेचा प्रयोग
सौर उर्जेबरोबरच भविष्यात पवन ऊर्जेच्या निर्मितीचे प्रयोग करण्याचाही विचार सुरू आहे. महामार्गाच्या कडेला तसेच वापरात नसलेल्या जमिनीवर पवन चक्क्या व सौर पॅनेल्स बसवून नैसर्गिक वारा आणि वाहनांच्या वेगामुळे निर्माण होणाऱ्या ड्राफ्टचा वापर करून वीज निर्मिती केली जाईल. या प्रकल्पामुळे MSRDC ला अतिरिक्त उत्पन्न मिळणारच आहे, शिवाय कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणपूरक विकासालाही चालना मिळेल.


