Maharashtra Weather: राज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत गारांसह पाऊस पडला. मात्र आता हवामानात पुन्हा मोठा बदल होत असून उन्हाचा तीव्रतेने अनुभव येऊ लागला आहे. तापमान झपाट्याने वाढत असून कमाल पारा पुन्हा 40 अंशांच्या दिशेने जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट जाणवणार असून काही भागांत पावसाची शक्यताही कायम आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट हवामानाचा त्रास वाढणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात एकीकडे उकाडा तर दुसरीकडे अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुढील दिवसांसाठी हवामान विभागाचे अंदाज असे:
- 23 मार्च:
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी येथे उष्णतेचा यलो अलर्ट.
सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. - 24 मार्च:
मुंबई, ठाणे, रायगड येथे उष्ण व दमट हवामानाचा इशारा.
सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड येथे पावसाचा अंदाज, तर सातारा, सांगली, पुणे, हिंगोली येथे हलक्या सरींची शक्यता. - 25 मार्च:
सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड येथे जोरदार पावसाचा यलो अलर्ट.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. - 26 मार्च:
यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा.
दरम्यान, आज राज्यातील काही भागांत तापमानात वाढ नोंदवली गेली. वाशिम, अकोला, अमरावती, सांगली, सोलापूर आणि ठाणे येथे 36 ते 37 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर इतर भागांत तापमान 35 ते 36 अंशांच्या दरम्यान राहिले. त्यामुळे येत्या काही दिवसांत नागरिकांना उकाडा आणि बदलत्या हवामानाचा दुहेरी त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.


