Sydney Terrorist Attack: ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात ज्यू समुदायावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित ज्यू समुदायाच्या हनुक्का उत्सवात बोलताना ट्रम्प यांनी ज्यू लोकांना अमेरिकेचा कायमस्वरूपी पाठिंबा असल्याचे ठामपणे सांगितले. सर्व देशांनी कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाच्या दुष्ट शक्तींविरोधात एकत्र उभे राहणे गरजेचे आहे. अमेरिका हेच करत आहे, असे ट्रम्प यांनी आपल्या भाषणात म्हटले.
सिडनीतील बोंडी बीच परिसरात रविवारी संध्याकाळी झालेल्या या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. ऑस्ट्रेलियन प्रशासनाने या हल्ल्याला इस्लामिक स्टेट (ISIS) प्रेरित दहशतवादी कारवाई ठरवले आहे. हनुक्का उत्सवादरम्यान ट्रम्प म्हणाले, या भयावह यहूदी-विरोधी हल्ल्याने प्रभावित झालेल्या सर्व पीडितांप्रती आणि ऑस्ट्रेलियातील जनतेप्रती मी माझ्या संवेदना आणि प्रार्थना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि जखमी लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतो. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या हल्ल्यामागे इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीचा प्रभाव असल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की हल्लेखोर वडील आणि मुलगा होते, जे ISIS च्या अतिरेकी विचारांनी प्रेरित होते. पोलिसांनी हल्लेखोरांच्या वाहनातून इस्लामिक स्टेटचा झेंडा जप्त केला असून तपास सुरू आहे. हा हल्ला त्या वेळी झाला, जेव्हा बोंडी बीच परिसरात ज्यू समुदायाचा हनुक्का उत्सव सुरू होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांचे वय अनुक्रमे ५० आणि २४ वर्षे होते. वडिलांचा गोळीबारात मृत्यू झाला असून मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात असून, दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.


