Gold Rate Today : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांमध्ये सोमवारी रात्री एक मोठी घडामोड घडली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला आयात कर (Tariff) कमी करण्याची घोषणा करताच, भारतीय बाजारपेठेत त्याचे जोरदार सकारात्मक पडसाद उमटले आहेत. शेअर बाजारासह मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
बाजारपेठेत ‘सुनामी’: सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले
मंगळवारी सकाळी बाजार उघडताच भांडवली बाजाराने ऐतिहासिक झेप घेतली. अमेरिकेच्या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाल्याने सेन्सेक्स २२०० अंकांनी वधारला. तर निफ्टी ७०० अंकांच्या उसळीसह ट्रेड करत आहे.
सोने-चांदीचे दर गगनाला; चांदी अडीच लाखांच्या पार
व्यापारी करार आणि जागतिक घडामोडींमुळे कमोडिटी मार्केटमध्ये (Commodity Market) मोठी उलथापालथ झाली आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या भावाने आज नवे उच्चांक गाठले आहेत.
- चांदी: एका दिवसात तब्बल २०,००० रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर २.५ लाख रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे.
- सोने: १० ग्रॅम सोन्याच्या दरात ४,५०० रुपयांची वाढ झाली असून, तो १ लाख ४८ हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे.
ट्रम्प यांची घोषणा आणि मोदींचे आभार
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावरील आयात शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली आणले आहे. या निर्णयाचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘X’ (ट्विट) वरून ट्रम्प यांचे आभार मानले. “मेड इन इंडिया उत्पादनांवरील कर कमी झाल्याचा आनंद आहे,” असे मोदींनी नमूद केले. या व्यापार करारामुळे भारताला आर्थिक फायदा होणार असला, तरी रशियाकडून तेल खरेदी आणि शून्य टक्के टॅरिफ या अटींवर भारत काय भूमिका घेतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.


